Thursday, September 9, 2021

जिल्ह्यातील दोन टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई; दहा आरोपींचा समावेश

 

नगर : नगर शहर व पारनेर परिसरात विविध गुन्ह्यांमधील दहा सराईत आरोपींच्या दोन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाठविलेले प्रस्ताव नाशिक विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षकांकडून मंजूर करण्यात आले आहेत.


गांधीनगर व बोल्हेगाव परिसरातील आकाश भाऊसाहेब डाके, गणेश भगवान कुर्‍हाडे, सागर भाऊसाहेब डाके, बाळासाहेब नाना वाघमारे यांच्यासह किरण सोमना मातंग (रा.हातगाव कांगले, शेवगाव) अशा पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात यातील आरोपींनी एकावर धारदार शस्त्राने वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. तसेच या आरोपींविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याने तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी या आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव केला होता.


तसेच पारनेर तालुक्यात दरोडे घालणार्‍या बेलगाव (ता.कर्जत) येथील भोसले टोळीवरही मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मीनल ईश्वर भोसले, संदीप ईश्वर भोसले, जमाल उर्फ पल्या ईश्वर भोसले, अतल्या उर्फ अतुल उर्फ योगेश ईश्वर भोसले, मटक्या उर्फ नारायण ईश्वर भोसले या पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने नगरसह बीड, पुणे, परभणी, सोलापूर जिल्ह्यात दरोेडे टाकलेले आहेत. या टोळीतील आरोपींवर संघटीतपणे केलेल्या गुन्ह्याचे तब्बल 14 गुन्हे दाखल आहेत. पारनेर येथे कामटवाडी येथे एका घरावर दरोडा टाकून या टोळीने 34 हजारांचा ऐवज लुटला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव केला होता.


पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हे दोन्ही प्रस्तावर नाशिक येथे पोलिस उपमहानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी पाठविले होते. या दोन्ही प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून, जिल्ह्यातील दोन टोळ्यांमधील तब्बल 10 गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. गुरुवारी (दि.9) सायंकाळी उशिराने नगरच्या पोलिस प्रशासनाकडे याबाबत आदेश प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only