Monday, September 6, 2021

नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात चार्जशीट दाखल


 नगर : अर्बन बँकेच्या 22.90 कोटींच्या फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल 500 पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून, यात चार आरोपी डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी दिली.


मशिनरी खरेदीसाठी 22.90 कोटींचे कर्ज घेऊन, मशिनरी खरेदी न करता या रकमेची परस्पर विल्हेवाट लावत अर्बन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे अधिकारी महादेव साळवे यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार डॉ. निलेश शेळके, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे, योगेश मालपाणी, जगदीश कदम व गिरीश अग्रवाल आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या प्रकरणाचा तपास करण्यात आला.


बँकेकडून मशिनरी खरेदीसाठी कर्ज घेऊन त्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली होती. बँकेतील हा कर्ज घोटाळा चांगलाच गाजला होता. आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास करत बँकेच्या कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच कर्जाच्या रकमा कुणा-कुणाच्या खात्यात वर्ग करण्यात आल्या, याचीही माहिती घेण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात चारही डॉक्टरांना अटकही केली होती. पोलिस तपासात पुरावे गोळा करण्यात आल्यानंतर डॉ. शेळके, डॉ. श्रीखंडे, डॉ. सिनारे व डॉ. कवडे या चार आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केले असल्याचे उपअधीक्षक सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील उर्वरीत तीन आरोपींविरोधातही लवकरच दोषारोप पत्र दाखल केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only