Friday, September 24, 2021

कोतवालीचे निरीक्षक मानगावकर नियंत्रण कक्षात; संपत शिंदे यांना नियुक्ती : पोलिस अधीक्षक मनोज पाटील


कोतवालीचे निरीक्षक मानगावकर नियंत्रण कक्षात; संपत शिंदे यांना नियुक्ती : पोलिस अधीक्षक मनोज पाटीलनगर : प्रतिनिधी

नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. एका प्रकरणात चौकशी सुरु असल्यामुळे तात्पुरती बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर सध्या बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना कार्यभार देत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. 


पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नंतर कोतवाली पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी राकेश मानगावकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कोतवाली पोलिस ठाण्याच्या आधी मानगावकर हे कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचा कारभार पाहत होते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी अधीक्षक पाटील यांनी मानगावकर यांना कोतवाली पोलिस ठाण्यात नियुक्ती दिली होती. 


गुरूवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक पाटील यांनी निरीक्षक राकेश मानगावकर यांची अचानक नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यानंतर मानगावकर सध्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे तात्पुरता कोतवालीचा चार्ज देण्यात आला होता. 


या संदर्भात पोलिस अधीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, निरीक्षक मानगावकर यांची नियंत्रणात बदली करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. एका प्रकरणात चौकशी सुरू असल्याने त्यांची तात्पुरती बदली केली आहे. त्यांच्या जागेवर आता पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्याकडे कार्यभार देण्यात येत असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only