Saturday, September 4, 2021

वीज खांब व पथदिव्यांवरील टीव्ही केबलमुळे युवकाचा बळी जागरूक नागरिक मंच करणार गुन्हा दाखल


 वीज खांब व पथदिव्यांवरील

टीव्ही केबलमुळे युवकाचा बळी


जागरूक नागरिक मंच करणार गुन्हा दाखल


अहमदनगर/प्रतिनिधी-महावितरण कंपनीचे वीज खांब व मनपाचे पथदिवे यांच्या वीजवाहक तारांसमवेत टाकल्या जात असलेल्या टीव्ही केबल नेटवर्क वायरीने नगरमधील 28 वर्षाच्या युवकाला हकनाक प्राण गमवावे लागले. टीव्ही केबल नेटवर्कच्या वायरी बेकायदेशीरपणे वीज खांब व पथदिव्यांवरून टाकल्या जात असतानाही महावितरण व महापालिका याकडे हेतुतः दुर्लक्ष करीत असल्याने युवकाला प्राण गमवावे लागले असल्याने या दोन्ही संस्थांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी सांगितले.


याबाबत माहिती देताना मुळे यांनी सांगितले की, बुधवार दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचे चिरंजीव व जागरूक नागरिक मंचचे सदस्य दत्ता गायकवाड यांचे पुतणे अजिंक्य गायकवाड (वय 28 वर्षे) यांचे साईनगर विनायक नगर परिसरातील राहत्या घरी विजेचा शॉक लागून दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे गायकवाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण या घटनेस महावितरण व महापालिका जबाबदार आहे, असा दावा करून मुळे म्हणाले, मी स्वतः एक अभियंता या नात्याने दत्ता गायकवाड व मकरंद घोडके यांच्यासमवेत ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्या ठिकाणाची बारकाईने पाहणी केली असता व अधिक तपास केला असता असे आढळून आले की घरामध्ये लोकल चॅनलची जी केबल येते, ती टीव्हीला लावताना त्या केबललाच चिकटून अजिंक्यचा दुर्दैवी अंत झाला आहे. त्या केबलमध्ये 4400 होल्ट इतका करंट उतरलेला होता आणि त्याचे कारण होते की, ही केबल हाय टेन्शन लाईनवरून जम्पिंग करून आणि अगदी पॅरलल पद्धतीने ठीकठिकाणी घरोघरी पोहोचवण्यात आलेली आहे. हा प्रकार अतिशय बेकायदेशीर असून संपूर्ण नगर शहरामध्ये अशा प्रकारच्या केबल एकूण एक एमएसईबीच्या खांबावरून करंट वाहणार्‍या लाईनला चिकटून वा पॅरलल पद्धतीने तसेच सर्व महापालिकेच्या स्ट्रीट लाईटचा (पथदिवे) आधार घेत घरोघर पोहोचलेल्या आहेत आणि याकडे संबंधित महापालिकेच्या अधिकार्‍यांचे आणि एमएसईबीच्या (महावितरण) अधिकार्‍यांचे व भरारी पथकाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कारणीभूत असल्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग ओढवलेला असल्यामुळे संबंधित सर्व अधिकार्‍यांवर वैयक्तिकरित्या जागरूक नागरिक मंचातर्फे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असे मुळे म्हणाले.


सर्वांचेच दुर्लक्ष


टीव्हीच्या केबल नगर शहरातील एकूण एक रस्त्यावर व एकूण एक खांबांवर दिसून येत आहेत, मग महापालिकेचे संबंधित अधिकारी व एमएसईबीची संबंधित भरारी पथके, त्यांच्याशी संबंधित इंजिनियर व कर्मचारी यांच्या डोळ्याला काय भात बांधलेला आहे काय की तिथून देखील हप्ते खाण्याचे षडयंत्र चालू आहे, असा संतप्त सवाल करून मुळे म्हणाले, येत्या आठ दिवसात संपूर्ण नगर शहरातील अशा विद्युत खांबांवरून आणि हाय होल्टेज तारांवरून घरोघर पोचवण्यात आलेल्या बेकायदेशीर आणि अतिधोकादायक टीव्ही केबलचे जाळे संबंधित अधिकार्‍यांनी जर उदध्वस्त केले नाही, तर त्यांच्यावर अजून वेगळे भ्रष्टाचाराचे फौजदारी गुन्हे, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे, कामात कुचराई केल्याचे गुन्हे दाखल करणार आहोत.


शहरातील विविध भागांमध्ये फिरून अगदी मेन रोडवरील देखील व्हिडिओ शूटिंग बेकायदेशीर केबलबाबत उपलब्ध करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.


--


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only